Special Story : आधी हाताने इशारे करून लाच मागितली, नंतर म्हणाला ढाई हजार दे दे और जाने दे… टप्प्यात आलेल्या लाचखोर वनरक्षकाचा असा झाला करेक्ट कार्यक्रम!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात हनवतखेड बिटच्या वनरक्षकास अडीच हजारांची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल, १४ जुलैला सायंकाळी पकडले. लाचखोर वनरक्षक कृष्णा लक्ष्मण जुमडे याने तक्रारदाराला रेतीचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी लाच मागितली होती. मात्र तक्रारदाराने जुंबडेची तक्रार “एसीबी’कडे करत त्याचा “करेक्ट कार्यक्रम’ केला. या कारवाईने वन विभागात प्रचंड …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात हनवतखेड बिटच्या वनरक्षकास अडीच हजारांची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल, १४ जुलैला सायंकाळी पकडले. लाचखोर वनरक्षक कृष्णा लक्ष्मण जुमडे याने तक्रारदाराला रेतीचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी लाच मागितली होती. मात्र तक्रारदाराने जुंबडेची तक्रार “एसीबी’कडे करत त्याचा “करेक्ट कार्यक्रम’ केला. या कारवाईने वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांत बुलडाणा “एसीबी’ने लाच घेणाऱ्या दोन जणांना जाळ्यात अडकवले आहे.

असा झाला कार्यक्रम…
जळगाव जामोद शहरातील सुलतानपुरा भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय शोएब (काल्पनिक नाव) याचा रेती वाहतुकीचा व्यवसाय आहे. १२ जुलै रोजी शोएब राजुरा धरण येथे ट्रॅक्टरमध्ये रेती भरत होता. त्यावेळी तिथे वनरक्षक जुबडे आला. रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी त्याने शोएबला साडेतीन हजार रुपये मागितले. शोएबने पैसे देण्यास नकार दिला असता जुबडे याने ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची धमकी दिली. त्‍यामुळे शोएबने जुंबडे याला ५०० रुपये दिले. तेव्हा जुबडे याने उर्वरित ३००० रुपये लवकर देण्यास सांगितले. त्यानंतर १४ जुलै रोजी सकाळी ११ च्या सुमारास जुंबडे हा पुन्हा शोएबच्या घरी गेला. तिथेही त्याने ३००० रुपयांची मागणी केली. एवढे पैसे माझ्याकडे नाहीत, असे शोएब म्हणाला असता सध्या जेवढे आहेत तेवढे दे, असे जुंबडे म्हणाला व पुन्हा ५०० रुपये घेऊन गेला. उर्वरित अडीच हजार रुपये संध्याकाळी शहरातील दुर्गा चौक येथे आणून देण्यास सांगितले. शोएबला लाच द्यायची नसल्याने त्याने तातडीने याबाबत बुलडाणा “एसीबी’कडे फोनद्वारे तक्रार दिली. “एसीबी’चे एक पथक तातडीने जळगाव जामोदकडे रवाना झाले. जळगाव जामोद येथील देव पेट्रोलपंपाजवळ “एसीबी’ पथकाने शोएबशी चर्चा केली लाचखोर जुबडे याला अटकवण्याची रणनीती आखली गेली.

पहिली पडताळणी…
“एसीबी’ने जळगाव जामोदला निघण्यापूर्वीच दोन शासकीय पंचांना सोबत नेले होते. पोलीस निरीक्षक श्रीमती ममता अफूने यांनी शोएबसोबत एका शासकीय पंचाला पडताळणी करायला जुबडेकडे पाठवले. यावेळी शोएबजवळ व्हाईस रेकॉर्डर देण्यात आले होते. जळगाव जामोद येथील कावरी टी सेंटरमध्ये जुंबडे याने हातवारे करत लाचेची मागणी केली. शोएबने कित्ते देने पडेंगे, तुमने मेरे कों १५ ते २० दिन चलने देना पडेगा… असे म्हणत पुन्हा शोएब आणि शासकीय पंच तिथून “एसीबी’ पथकाजवळ आले. “एसीबी’च्या पोलीस निरीक्षक अफूने यांनी व्हाईस रेकॉर्डरमधील संभाषण ऐकले. मात्र जुंबडे याने हातवारे करत लाच मागितल्याने व स्पष्ट लाच न मागितल्याने पुन्हा पडताळणी कारवाई करण्याचे ठरविण्यात आले.

दुसरी पडताळणी…
दुसऱ्या पडताळणी वेळी शोएबजवळ पुन्हा व्हॉइस रेकॉर्डर देण्यात आले. एका शासकीय पंचालाही त्याच्यासोबत पाठविण्यात आले. दुर्गा चौकात जुंबडे आणि शोएबची पुन्हा भेट झाली. त्यावेळी शोएब जुबडेला म्हणाला, की तुम खुलके क्यू नहीं बोलते? तेव्हा लाचखोर जुंबडे म्हणाला की, क्या बोलेंगे बुधवार बोला था ना… त्यावर शोएब म्हणाला की, आखरी बोलो मेरे को इत्ता होना. त्यावर जुबडे म्हणाला की ढाई हजार देदे और जाने दे… असे बोलून अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व रक्कम अर्ध्या तासात आणून देण्यास सांगितले.

असा झाला करेक्ट कार्यक्रम…
दुसऱ्या पडताळणीत जुंबडे याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने सापळा कारवाई करण्याचे ठरवण्यात आले. ५०० रुपयांच्या पाच नोटांना पावडर लावण्यात आली. जुंबडे याने शोएबला दुर्गा चौकात नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्समागे बोलावले होते. याच परिसरात एसीबीने सापळा रचला. सात वाजून १२ मिनिटांनी शोएबकडून लाचखोर वनरक्षक कृष्णाजुंबडे याने अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारली. शोएबने पूर्वनियोजित इशारा करताच “एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी वनरक्षकावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले.