Special Story : ज्या मैदानावर सैन्यभरतीची तयारी केली, त्याच मैदानावर उद्या होणार अंत्यसंस्कार; घरी येण्याचे स्टेट्स ठेवले होते, बहिणीला वाढदिवसाचे गिफ्ट अन्‌ वडिलांचा उपचार करण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण!

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीचे वीर जवान कैलास भारत पवार यांच्यावर उद्या, ४ ऑगस्टला चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारी प्रशासनाने केली आहे. सैन्यभरतीचे ध्येय उराशी बाळगून ज्या मैदानावर रणरणत्या उन्हात कैलास पाठीला टायर बांधून धावला, त्याच मैदानावर “शहीद जवान कैलास अमर रहे…’ …
 

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीचे वीर जवान कैलास भारत पवार यांच्यावर उद्या, ४ ऑगस्‍टला चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारी प्रशासनाने केली आहे. सैन्यभरतीचे ध्येय उराशी बाळगून ज्या मैदानावर रणरणत्या उन्हात कैलास पाठीला टायर बांधून धावला, त्याच मैदानावर “शहीद जवान कैलास अमर रहे…’ च्या घोषणांनी आकाशाचं काळीजही फाटेल. सकाळी दहाला हा अंत्‍यसंस्‍कार होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी “बुलडाणा लाइव्ह’ला दिली.

शहीद कैलास पवार कुटुंबियांसह.

३१ जुलैला सायंकाळी आला तो फोन…
१ ऑगस्ट २०२० रोजी वर्षभरापूर्वी कैलास ऊर्फ पप्पू घरच्यांचा निरोप घेऊन द्रास सेक्टरसाठी रवाना झाला होता. ३० जुलै २०२१ ला रात्री आठला तासभर तो व्हिडिओ कॉलद्वारे घरच्यांशी बोलला. उद्या घरी निघतोय, २-३ दिवसांत येतो. उद्या (३१ जुलै) संध्याकाळी कॉल करतो, असे म्हणत त्याने फोन ठेवला तो कायमचाच. (विशेष स्‍टोरी बुलडाणालाइव्ह डॉट कॉम) ३१ जुलैला संध्याकाळी फोन आला, मात्र हा फोन थेट कैलासच्या मृत्यूची वार्ता देण्यासाठीच… वर्षभर द्रास सेक्टरमध्ये सेवा दिल्यानंतर पप्पूदादा सहा महिन्यांसाठी सुटीवर येणार होता. घरी येतानाचे स्टेट्स सुद्धा त्याने व्हाॅटस ॲपला ठेवले होते. रोज मित्रांना व घरच्यांना तो व्हिडिओ कॉल करायचा.

याच तालुका क्रीडा संकुलाच्‍या मैदानावर होणार अंत्यसंस्‍कार.

बहिणीला स्‍कूटी घेऊन देणार होता…
१० ऑगस्टला लहान बहीण पूजाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला तो तिला स्‍कूटी गिफ्ट देणार होता. घराचे अर्धवट बांधकाम त्याला पूर्ण करायचे होते. वडिलांचा उपचार, बहिणीचे आणि त्याचेही लग्न असे बरेच विषय मार्गी लावण्याचा विचार या सुटीत घरच्यांनी केला होता. १६ डिसेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर कैलासने घरची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. बहीण- भावाचे शिक्षण, घराचे बांधकाम यासाठी तो एकमेव कर्ता पुरुष होता. ३ महिन्यांपूर्वीच वडिलांची बायपास झाली. मात्र ही बातमी त्याला कळवण्यात आली नव्हती. ( विशेष स्‍टोरी बुलडाणालाइव्ह डॉट कॉम) बाबांची तब्येत बरी नसते हे त्याला माहीत असल्याने तो रोज व्हिडिओ कॉल करून वडिलांना औषध वेळेवर घेण्याची आठवण द्यायचा. शहीद जवान कैलास ऊर्फ पप्पू पवार यांच्या पश्चात आई उज्‍ज्वलाबाई, वडील भारत, लहान भाऊ अक्षय, लहान बहीण पूजा आणि आजी असा परिवार आहे. आई अंगणवाडी सेविका आहे. वडील मजुरी करायचे मात्र तीन महिन्यांपूर्वीच बायपास सर्जरी झाल्याने ते घरीच असतात. भाऊ अक्षयचे बीएस्सी कॉम्प्युटर झाले आहे, तर बहीण पूजा बीएस्सी मायक्रो बॉयोलॉजी द्वितीय वर्षाला शिकते.

राहत्‍या घरातून निघेल अंत्‍ययात्रा
उद्या सकाळी साडेआठला पार्थिव गजानननगर येथील राहत्या घरी पोहोचेल. त्यानंतर खंडाळा चौफुली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टँड या मार्गाने अंत्ययात्रा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात पोहोचणार आहे. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

हा व्हिडिओ ठरला शेवटचा…